०४ जुलै २०२६

जळगाव मध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्याबड्या नेत्याच्या "त्या" ज्वेलर्स दुकानावर सीबीआयचा छापा



 जळगाव, महाएल्गार न्युज :जळगाव मधून एक मोठी बातमी समोर आली असून जळगावच्या आरएल ज्वेलर्सची सीबीआयकडून पुन्हा चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जळगावच्या आरएल ज्वेलर्सची सीबीआय कडून पुन्हा चौकशी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी खासदार ईश्वर जैन आणि परिवाराच्या असलेल्या आरएल ज्वेलर्ससह मनराज मोटर्स या कंपन्यांची चार वर्षापूर्वी सीबीआयने चौकशी केली होती. अशातच काल (3 जुलै) पुन्हा एकदा सीबीआयचे (CBI) पथक जळगावमध्ये दाखल झाले असून त्यांनी आरएल ज्वेलर्स या कंपनीची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

 

नेमकं प्रकरण आहे काय ? 
जळगाव येथील प्रसिद्ध राजमल लखीचंद (आरएल) ज्वेलर्सवरं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ५२५ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी (कर्ज घोटाळा) सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) द्वारे कारवाई करण्यात आली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) दिल्ली सीबीआयकडे तक्रार केली होती, त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणाच्या आधारे ऑगस्ट २०२३ मध्ये ईडीच्या सुमारे ६० अधिकाऱ्यांनी तब्बल ४५ तास जळगाव येथील आरएल ग्रुपच्या कार्यालयांवर व निवासस्थानांवर छापे टाकले होतेः या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे सोने, हिऱ्यांचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये, ईडीने मनी लाँड्रिग (PMLA) कायद्यांतर्गत राजमल लखीचंद ग्रुपशी संबंधित जळगाज, मुंबई, ठाणे येथील सुमारे ३१५ कोटी रुपयांच्या ७० मालमत्ता जप्त केल्या होत्या.

 

जळगाव मधील राजमल लखीचंद (RL) ग्रुपच्या 'आरएल ज्वेलर्स' आणि इतर संबंधित कंपन्यांवर स्टेट बँकेची ३५२.४९ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने (CBI) छापे टाकले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या पथकांनी संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्याशी संबंधित कार्यालये व घरांची झाडाझडती घेऊन कागदपत्रे व लॉकरच्या चाव्या ताब्यात घेतल्या आहेत. मार्च २०२५ मध्ये, राजमल लखीचंद ज्वेलर्सने आपली फसवणूक केली नसल्याचे स्टेट बँकेने स्पष्ट केल्याचे संचालक व माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी जाहीर केले होते. अशातच काल पुन्हा आरएल ग्रुपच्या आरएल ज्वेलर्स या कंपनीची सीबीआयने चौकशी सुरू केली असून काही कागदपत्र आणि लॉकरची चाबी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. सीबीआयच्या या चौकशीच्या फेऱ्या सुरू असतानाच, माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी बँकेचे दावे फेटाळून लावले आहेत आणि जैन समूहाने या प्रकरणात कोणतीही फसवणूक केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र स्टेट बँकेने केलेले दावे ही चुकीचे असून, स्टेट बँकेने दिलेल्या कर्जाच्या पेक्षा जास्त रक्कम आपल्याकडून वसूल केली असल्याने, आपलेच पैसे स्टेट बँकेकडे निघत असल्याचा दावा करत, सीबीआय चौकशी करत असली तरी त्यात कोणतेही तथ्य त्यांना मिळणार नसल्याचं ईश्वरलाल जैन यांनी म्हटल आहे.

निंभोरा ग्रामपंचायतीच्या कचरा ट्रॅक्टर ट्रॉलीची झाली दुरवस्था

 अपघाताचा धोका; वाहन दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी


रावेर प्रतिनिधी : निंभोरा ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कचरा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या महिंद्रा युवराज २१५ ट्रॅक्टर व ट्रॉलीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रत्यक्ष बाजारपेठेतून कचरा भरून जातानाचा हा ट्रॅक्टर धोक्याचे निमंत्रण देत आहे. म्हणून या वाहनाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

या ट्रॅक्टरच्या पुढील दोन्ही टायर पूर्णपणे झिजलेले असून, ग्रिप संपलीआहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे ट्रॅक्टरचे ब्रेकही लागत नाहीत. पुढील बंपर गायब असून, इंजिनचे सुटे भाग उघडे पडले आहेत. मिटर, बॅटरी व वायरिंगची अवस्था धोकादायक आहे. चालकाचे आसन (सीट) पूर्णपणे फाटलेले व खराब झालेले असल्याने कर्मचाऱ्यांनामोठ्या त्रासातून काम करावे लागत आहे. केवळ ट्रॅक्टरच नव्हे, तर कचरा वाहणारी ट्रॉलीही पूर्णपणे गंजून सडलेली आहे. ट्रॉलीचे मागील फाटक तुटल्याने वाहतुकीदरम्यान कचरा रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ट्रॉलीवरक्षमतेपेक्षा जास्त कचरा व झाडांचा पाला-पाचोळा भरलेला आहे. हा ट्रॅक्टर शाळा, बाजार व वर्दळीच्या भागातून रोज जातो. ब्रेक नसल्याने व ट्रॉली नादुरुस्त असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो. ग्रामस्थांनी तातडीने या वाहनाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया

निंभोरा ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक मंडळ असल्याने खर्चावर मर्यादा आहेत. मात्र, तरीही आम्ही यासंदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने लवकरच ट्रॅक्टरची दुरुस्ती केली जाईल.

- राहुल लोखंडे, ग्रामपंचायत अधिकारी, निंभोरा (ता. रावेर)