रावेर प्रतिनिधी :
नगरपालिका प्रशासनाने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेत विविध रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली. या मोहिमेमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास आणि नागरिकांना मोकळा रस्ता उपलब्ध होण्यास मदत होणार असली, तरी दुसरीकडे हातगाडी, फेरीवाले आणि लघु व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दिवसभर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांची दुकाने व हातगाड्या हटविण्यात आल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. "अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे, मात्र पर्यायी जागा उपलब्ध करून देत कारवाई झाली असती तर आमच्यावर उपासमारीची वेळ आली नसती," अशी भावना अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केली.
नागरिकांच्या मते, शहर सुशोभीकरण आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक असले, तरी गरीब व लघु व्यावसायिकांचे पुनर्वसन करून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
आता रावेर नगरपालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेते आणि प्रभावित व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी कोणती उपाययोजना करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा