मुख्याधिकाऱ्यांची मुजोरी सुरू असताना नगराध्यक्ष आणि नगरसेवक बनले 'बघ्या'; भीमसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट
फैजपूर | प्रतिनिधी
फैजपूर नगरपालिकेतील प्रशासनाची मुजोरी आणि अधिकाऱ्यांचा बेलगाम कारभार आता शिगेला पोहोचला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरील जीर्ण झालेल्या नामफलकाची दुरुस्ती करण्याची अत्यंत साधी आणि न्याय्य मागणी करणाऱ्या 'भीमपुत्र ग्रुप'चे अध्यक्ष पप्पू मेढे यांना थेट गल्लीछाप भाषेत उत्तरे देत, मुख्याधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी अनुयायांचा घोर अवमान केला आहे. सर्वांत संतापजनक बाब म्हणजे, प्रशासनाचा हा उर्मटपणा सुरू असताना तिथे उपस्थित असलेले नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, अभियंते आणि नगरसेवक केवळ 'बघ्याची' भूमिका घेत होते. या धक्कादायक प्रकारामुळे भीमसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, मुख्याधिकाऱ्यांवर 'ॲट्रॉसिटी' दाखल करण्याचा खणखणीत इशारा पप्पू मेढे यांनी दिला आहे.
नेमका प्रकार काय घडला?
याप्रश्नी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, यासाठी यापूर्वीच मुख्याधिकारी यांना रीतसर निवेदन देण्यात आले होते. आज पालिकेत झालेल्या सभेत 'भीमपुत्र ग्रुप'चे अध्यक्ष पप्पू मेढे यांनी याच विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील फलक अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, पालिकेने तो नवीन तयार करून व्यवस्थित लावावा, अशी रास्त मागणी त्यांनी केली.
मात्र, ही विनंती ऐकून घेण्याऐवजी मुख्याधिकाऱ्यांनी अत्यंत उद्दामपणे पप्पू मेढे यांना म्हटले की, तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाखाली केवळ वाद करत आहात. या भागातील अतिक्रमण काढण्यात येणार असून त्यासोबत हा बोर्डही काढला जाईल, त्यामुळे यावर कोणतीही उपाययोजना केली जाणार नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. यावर पप्पू मेढे यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत तुम्ही अतिक्रमण काढत नाही, तोपर्यंत किमान त्या फलकाची दुरुस्ती करून महामानवाचा सन्मान राखा. मात्र, प्रशासकीय सभ्यतेचे सर्व संकेत धुडकावून लावत मुख्याधिकाऱ्यांनी मेढे यांच्याशी थेट शाब्दिक चकमक उडवली आणि गल्लीछाप भाषेचा वापर करत महामानवाचा अपमान केला.
लोकप्रतिनिधींची लाजिरवाणी 'बघ्याची' भूमिका
एका बाजूला मुख्याधिकारी महामानवाचा आणि आंबेडकरी जनतेचा अपमान करत असताना, जनतेच्या मतांवर निवडून आलेले नगराध्यक्ष, बांधकाम सभापती आणि नगरसेवक तिथेच बसून होते. यापैकी एकाही पदाधिकाऱ्याला या अपमानाचा जाब विचारावासा वाटला नाही. महामानवाच्या नावाने राजकारण करणाऱ्या या लोकप्रतिनिधींची जीभ अशा वेळी का शिवली गेली होती? प्रशासनातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम हे पदाधिकारी करत आहेत का? त्यांना हा अपमान मान्य आहे का? असे संतप्त सवाल आता फैजपूरची जनता विचारत आहे.
'ॲट्रॉसिटी' दाखल करणारच! -सामाजिक कार्यकर्ते पप्पू मेढेंचा इशारा
निवेदनाची दखल घेऊन सन्मानजनक तोडगा काढण्याऐवजी मुख्याधिकाऱ्यांनी जो उर्मटपणा दाखवला, त्यामुळे संपूर्ण प्रशासनाचे जातीयवादी आणि बेजबाबदार स्वरूप चव्हाट्यावर आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे भीमसैनिकांमध्ये तीव्र नाराजी असून आता ही लढाई केवळ निवेदनापुरती मर्यादित राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा 'भीमपुत्र ग्रुप'चे अध्यक्ष पप्पू मेढे यांनी घेतला आहे. त्यांनी प्रशासनाला आणि बघ्याची भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना थेट इशारा देताना सांगितले की, महामानवाचा अपमान करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईलच.
फैजपूर नगरपालिकेतील या हुकूमशाही प्रवृत्तीला वेळीच ठेचले नाही, तर भविष्यात हा रोष रस्त्यावर उतरेल. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी वेळीच भानावर येऊन या प्रकरणावर कठोर कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा आंबेडकरी जनतेने दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा