रावेर:
खिर्डी बुद्रुक येथील एका हॉटेल व्यावसायिकाची मोटारसायकल चोरीला गेल्याप्रकरणी निंभोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यात खिर्डी बु. येथील माजी सरपंच आणि संशयित आरोपी किरण उर्फ गफूर पितांबर कोळी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
घटनेचा तपशील:
खिर्डी बुद्रुक येथील हॉटेल व्यावसायिक प्रवीण रमेश जैस्वाल यांनी २९ जुलै २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांची सुमारे ७० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एमएच १९ ईएक्स २६७९) आपल्या घरासमोर पार्क केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना आपली मोटारसायकल तिथे दिसून आली नाही. मोटारसायकल चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
अशी झाली कारवाई:
जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी तपासाला वेग दिला होता. तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे निंभोरा पोलिसांनी किरण उर्फ गफूर पितांबर कोळी याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर व सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रिजवान पिंजारी, पोहेकॉ किरण चाटे, पोकॉ सुभाष शिंदे व पोकॉ सरफराज तडवी यांच्या पथकाने केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा