रावेर पोलिसांची 'सिनेस्टाईल' कारवाई की नियोजित ढिसाळपणा? गुन्हेगारांना मोकळे रान; 'चिखला'मुळे वाचली पोलिसांची अब्रू! - महा एल्गार

Breaking

एकूण पृष्ठदृश्ये

१२ जुलै २०२६

रावेर पोलिसांची 'सिनेस्टाईल' कारवाई की नियोजित ढिसाळपणा? गुन्हेगारांना मोकळे रान; 'चिखला'मुळे वाचली पोलिसांची अब्रू!

 खात्रीशीर माहिती असूनही नाकाबंदी का नाही? ३ मुख्य आरोपी पोलिसांच्या डोळ्यांदेखत फरार !


रावेर (विशेष प्रतिनिधी):
रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्य टोळीला पकडण्यात रावेर पोलिसांना यश आल्याचा दावा अधिकृत प्रेस नोटद्वारे करण्यात आला आहे. मात्र, या संपूर्ण कारवाईचा घटनाक्रम आणि पोलिसांनी मांडलेली कथा पाहिल्यास, यात पोलिसांच्या नियोजनातील गंभीर त्रुटी आणि ढिसाळ कार्यपद्धती चव्हाट्यावर आली आहे. गुप्त बातमीदाराकडून गुन्हेगारांची अचूक माहिती मिळूनही पोलीस त्यांना सुरुवातीलाच रोखण्यात अपयशी का ठरले, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात असून या प्रकरणाला आता एक वेगळेच वळण मिळाले आहे.


पक्की माहिती असूनही ढिसाळ नियोजन!

प्रेस नोटमधील माहितीनुसार, पाल गावातून ५ ते ६ संशयित इसम पांढऱ्या रंगाच्या इको कारमधून (एमएच-०४-एफझेड-५२३१) घातक हत्यारांसह रावेरकडे सुसाट निघाल्याची "खात्रीशीर" माहिती पोलिसांना मिळाली होती. जर माहिती इतकी अचूक होती, तर पोलिसांनी पाल-रावेर मुख्य रस्त्यावर तातडीने मजबूत नाकाबंदी (Roadblock) का लावली नाही? पोलिसांची पथके रस्त्यावर धावत राहिली आणि आरोपींची कार आभोडा गावाजवळ पोलिसांना हुलकावणी देत, इतर दुचाकींना कट मारत थेट रावेर शहराच्या मुख्य आठवडे बाजारापर्यंत पोहोचली. सुदैवाने बाजारात कोणतीही मोठी जीवितहानी किंवा दुर्घटना घडली नाही, अन्यथा पोलिसांच्या या ढिसाळ नियोजनाची मोठी किंमत निष्पाप नागरिकांना मोजावी लागती.

            

पोलीस पाठीमागे, मग ३ आरोपी फरार कसे झाले?

या कारवाईतील सर्वात संशयास्पद आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा भाग म्हणजे आरोपींचा पाठलाग स्वतः पोलिसांची पथके करत होती. परंतु, जेव्हा बुऱ्हाणपूर रोडवरील एका शेतात आरोपींची गाडी चिखलात फसली, तेव्हा पोलिसांच्या आधी तिथे १५ ते २० लोकांचा स्थानिक जमाव कसा पोहोचला? पोलीस पाठीमागे असतानाच गाडीतील ३ मुख्य आरोपी (ज्यात पाल गावचा स्थानिक मेहरबान तडवी होता) पोलिसांच्या डोळ्यांदेखत शेतशिवाराचा फायदा घेऊन फरार झाले. पोलिसांचा एवढा मोठा ताफा पाठीमागे असताना आणि गुन्हा उघडकीस आलेला असताना मुख्य संशयित पळून जाण्यात यशस्वी कसे होतात, याचे उत्तर पोलीस प्रशासनाला द्यावेच लागेल.

रणनीती शून्य; केवळ 'नशिबानेच' वाचवली पोलिसांची अब्रू!

या संपूर्ण कारवाईत पोलिसांच्या रणनीतीपेक्षा 'नशिबाचा' आणि 'चिखलाचा' वाटा मोठा होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जर ती इको कार चिखलात अडकली नसती, तर कदाचित सर्वच्या सर्व आरोपी आणि तो संशयास्पद मुद्देमाल पोलिसांना चकवा देऊन फरार झाला असता. चिखलामुळे गाडी थांबली आणि जमावाने दोन आरोपींना (निखिल पाटील आणि अल्ताफ शेख, रा. ठाणे) पकडून ठेवले, म्हणूनच ते पोलिसांच्या हाती लागले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here