रावेर पोलिसांची धडक कारवाई; अजंदा रेल्वे ब्रिजजवळील रस्ता लूट प्रकरणातील तीन आरोपींना २४ तासांत अटक, मुद्देमाल जप्त! - महा एल्गार

Breaking

एकूण पृष्ठदृश्ये

०६ जुलै २०२६

रावेर पोलिसांची धडक कारवाई; अजंदा रेल्वे ब्रिजजवळील रस्ता लूट प्रकरणातील तीन आरोपींना २४ तासांत अटक, मुद्देमाल जप्त!

 

रावेर प्रतिनिधी :

         रावेर तालुक्यातील अजंदा गावाजवळील रेल्वे ब्रिजजवळ फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींना रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल जप्त केला असून न्यायालयाने आरोपींना ९ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



मजूर देण्याच्या बहाण्याने रचला सापळा 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख जाबीर शेख अमान (वय ४१, रा. फारुकी आजम कॉलनी, विनावल, ता. रावेर) हे बांधकाम ठेकेदार आहेत. आरोपी मुस्तकीम याने फिर्यादींना फोन करून दोन मजूर मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यांना विवरा येथे बोलावून घेतले. मजूर कामासाठी अजंदा गावी गेल्याचे सांगून मुस्तकीम फिर्यादींना अजंदा रेल्वे पुलाजवळ घेऊन गेला.

चाकूचा धाक दाखवून ऑनलाईन लूट

रेल्वे पुलाजवळ आधीच पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा गाडीजवळ दोघे जण उभे होते. मुस्तकीमने 'हेच ते मजूर' असल्याचे सांगून फिर्यादींना गाडी थांबवण्यास लावली. मजुरीबाबत बोलण्याच्या बहाण्याने त्यांना शेतात नेण्यात आले. तिथे एका आरोपीने फिर्यादीच्या गळ्यावर चाकू ठेवून पैशांची मागणी केली. खिशातील ५०० रुपये काढून घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल हिसकावला आणि फोन पे (PhonePe) चा पिन जबरदस्तीने विचारून दुसऱ्या एका खात्यावर वेळोवेळी ८,००० रुपये ट्रान्सफर करून घेतले व फरार झाले. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुप्त बातमीदाराच्या माहितीने फुटला सुगावा 

घटना रात्रीची असल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे अस्पष्ट होते. मात्र, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपींच्या गाडीबाबत गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे रावेर पोलीस स्टेशनच्या डीबी (DB) पथकाने तातडीने खातरजमा केली असता, आरोपी मुस्तकीम याने गुन्ह्याची कबुली दिली.

तीन आरोपी अटकेत; एक सराईत गुन्हेगार

पोलिसांनी या प्रकरणात खालील तीन आरोपींना अटक केली आहे:१) शेख मुस्तकीम शेख अकील (वय २२, रा. फतेह नगर, रावेर)२) शेख मोईन शेख नईम (वय १९, रा. खिर्डी रोड, विवरा)३) फैजल बेग हितायत बेग (वय १९, रा. शंकर प्लॉट, रावेर, जि. जळगाव)यातील आरोपी शेख मोईन शेख नईम हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही रावेर पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध एका वयस्कर व्यक्तीला अशाच प्रकारे लुटल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (क्र. MH19ED5580) आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने दि. ०९/०७/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी दिली असून त्यांच्याकडून आणखी बरेच लुटीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

या पथकाने केली कारवाई

ही धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप गावीत (जळगाव विभाग), आणि पोलीस उपअधीक्षक मा. श्री. अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत रावेर पोलीस स्टेशनचे पो.नि. संदीप पाटील, पो.उप.निरीक्षक मनोज महाजन, पो.उप.निरीक्षक तुषार पाटील, तसेच गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण आणि सुकेश तडवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.उप.निरीक्षक मनोज महाजन करत आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here