रावेरमध्ये अल्पवयीन मुलीला ओळखपत्राशिवाय रूम देणे पडले महागात; लॉज मॅनेजरसह तरुण गजाआड
रावेर ता. प्रतिनिधी:
कोणतीही ओळख नोंद न करता अल्पवयीन मुलीला लॉजमध्ये रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी रावेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी लॉजिंग मॅनेजरसह एका तरुणाला अटक केली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
लॉजमध्ये मुलीला घेऊन गेला होता तरुण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नितीन सुभाष महाजन (वय २३, रा. वाघोड,ता. रावेर) हा एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फ्रेश होण्यासाठी सावदा रोडवरील 'वैशाली लॉजिंग' येथे घेऊन गेला होता.
सणांच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलिसांकडून शहरातील विविध हॉटेल्स आणि लॉजिंगची अचानक तपासणी सुरू होती. या तपासणी मोहिमेदरम्यान संबंधित मुलगी आणि तरुण लॉजमध्ये एकत्र असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
माहिती लपवणे मॅनेजरला पडले महाग
पोलिसांनी चौकशी केली असता, लॉजमध्ये अल्पवयीन मुलीला रूम देताना आवश्यक ती ओळख पडताळणी करण्यात आली नव्हती. तसेच लॉजच्या रजिस्टरमध्येही त्यांची कोणतीही नोंद नव्हती. वैशाली लॉजिंगचा मॅनेजर सुभाष चुडामण पाटील (वय ४३, रा. अजंदा, ता. रावेर) याला अल्पवयीन मुलगी लॉजमध्ये असल्याची पूर्ण माहिती होती. ही बाब पोलिसांना कळविणे आवश्यक असतानाही त्याने ती माहिती मुद्दाम लपवून ठेवली. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत दोघांना अटक केली
- भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ६४(२)(l), ३५१ (२) (३)
- पॉक्सो (POCSO) अधिनियम २०१२: कलम ४, १६ व २१



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा