अंगणवाडी भरती वादाच्या भोवऱ्यात स्थानिक महिलांना डावलल्याचा आरोप; चौकशीपूर्वी भरती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी. - महा एल्गार

Breaking

एकूण पृष्ठदृश्ये

२६ ऑगस्ट २०२६

अंगणवाडी भरती वादाच्या भोवऱ्यात स्थानिक महिलांना डावलल्याचा आरोप; चौकशीपूर्वी भरती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी.

 यावल ता. प्रतिनिधी 

           यावल येथील अंगणवाडी भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिक पात्र महिलांना डावलून बाहेरील गावातील उमेदवाराला प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेची जिल्हास्तरावर सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती स्थगित ठेवावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे यावल तालुकाध्यक्ष तथा सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश पांडुरंग अडकमोल यांनी तक्रारीद्वारे केली आहे.



यावल येथील अंगणवाडी भरतीची प्रथम यादी दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये स्थानिक महिलांना डावलून बाहेरील गावातील महिलेचे नाव प्रथम क्रमांकावर आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पात्र महिला उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा सवाल उपस्थित झाला आहे.

भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जाहीर झालेल्या यादीतील सर्व उमेदवारांच्या अर्जांची तसेच मूळ कागदपत्रांची जिल्हास्तरावर सखोल पडताळणी करण्यात यावी. उमेदवारांना देण्यात आलेले गुण नियमानुसार व योग्य आहेत की नाहीत, याचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी अडकमोल यांनी केली आहे.

                 जिल्हास्तरावर अर्जांची छाननी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात यावी. अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सतीश अडकमोल यांनी दिला आहे.दरम्यान, या तक्रारीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी आणि पात्र स्थानिक उमेदवारांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here