चिनावल येथील बुद्ध विहारात ६ सप्टेंबर रोजी 'विशेष महिला धम्म प्रशिक्षण शिबिर'; प्रवचनाच्या प्रभावातून अनिष्ट रुढी-परंपरांना मूठमाती - महा एल्गार

Breaking

एकूण पृष्ठदृश्ये

२६ ऑगस्ट २०२६

चिनावल येथील बुद्ध विहारात ६ सप्टेंबर रोजी 'विशेष महिला धम्म प्रशिक्षण शिबिर'; प्रवचनाच्या प्रभावातून अनिष्ट रुढी-परंपरांना मूठमाती

रावेर (ता. प्रतिनिधी, संतोष ढिवरे):
          चिनावल येथील भीम ज्योती बुद्ध विहारामध्ये पूजनीय भदंत नागवंश महाथेरो (नागपूर) यांच्या पावन मार्गदर्शनाखाली वर्षावास कार्यक्रम अत्यंत उत्साहात सुरू आहे. या वर्षावासाच्या २७ व्या दिवशी अनेक धम्म उपासक व उपासिकांच्या उपस्थितीत विशेष प्रबोधन संपन्न झाले.

धम्मसंस्कार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार
   या प्रसंगी पूजनीय भंतेजींनी उपस्थितांना बौद्ध धर्मातील 'गर्भ मंगल' आणि 'नामकरण संस्कार' या दोन संस्कारांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रवचनादरम्यान भंतेजींनी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्माविषयीच्या क्रांतिकारी विचारांचा संदर्भ दिला. "धम्म ही मानवी जीवनाची आचारसंहिता असून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यावर आधारलेला धम्मच मानवी समाजाचा उद्धार करू शकतो," असे भंतेजींनी स्पष्ट केले.

प्रवचनाच्या प्रभावातून प्रत्यक्ष वैचारिक परिवर्तन

          भंतेजींच्या या धम्मदेसनेचा चिनावल नगरीत प्रत्यक्ष सकारात्मक प्रभाव पाहायला मिळाला. परिसरात 'रोट' हा सण साजरा केला जात असताना, येथील रहिवासी अलका तायडे यांनी विहारातील संपूर्ण जनसमुदायासमोर पूजेचे संपूर्ण साहित्य आणून ठेवले. "आम्ही कोणताही रोट किंवा हिंदू सण साजरा केलेला नाही आणि यापुढेही करणार नाही," असा खंबीर आणि क्रांतिकारी निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या धाडसी व परिवर्तनवादी निर्णयाचे विहारामधील सर्व उपासक-उपासिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विशेष कौतुक व अभिनंदन केले.


रविवार, 6 सप्टेंबर रोजी विशेष महिला शिबिर

 भीम ज्योती बुद्ध विहार समिती व उपासक - उपासिका संघाच्या वतीने रविवार,दिनांक 6 सप्टेंबर रोजी विशेष "महिला धम्म प्रशिक्षण शिबिर" आयोजित करण्यात आले आहे. या संपूर्ण शिबिराला आणि वर्षावासाला  पूजनीय भदंत नागवंश महाथेरो याचे मुख्य मार्गदर्शन लाभणार आहे.

आयोजकांचे आवाहन
भीम ज्योती बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयुष्यमान संजय भालेराव व सर्व समिती सदस्यांनी आवाहन केले आहे की, रोज सायंकाळी ७:०० ते ८:३० या वेळेत धम्मदेसनेचा लाभ घेण्यासाठी सर्व उपासक-उपासिकांनी बुद्ध विहारामध्ये वेळेवर उपस्थित राहावे. तसेच, चिनावल व परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी ६ सप्टेंबरच्या शिबिरामध्ये सहभागी होऊन धम्माची ओळख, ज्ञान व समज वाढवण्यासाठी सहकार्य करावे, अशी आग्रहाची विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
आयोजक : भीम ज्योती बुद्ध विहार समिती व उपासक-उपासिका संघ, चिनावल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here