रावेर तालुक्यात प्रतिनिधी
नदीपात्रातून होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उत्खननाने एका निष्पाप चिमुकल्याचा जीव घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या गौरखेडा येथील 'सुकी' नदीपात्रात वाळूमाफियांनी खोदलेल्या धोकादायक खड्ड्यात पाय घसरून पडल्याने एका ७ वर्षीय मुलाचा बुडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दि. १६/०७/२०२६ सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. अविनाश रवींद्र जवरे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गौरखेडा परिसरात तीव्र शोककळा पसरली असून, अवैध वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
खेळता खेळता ठरला मृत्यूचा सापळा
सुकी नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे. यामुळे नदीपात्रात अत्यंत खोल आणि धोकादायक खड्डे निर्माण झाले आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाण्याचा साठा झाला असून ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. काल सायंकाळी खेळत असताना चिमुकल्या अविनाशचा पाय अशाच एका खोल खड्ड्यात घसरला आणि पाण्यात बुडून त्याचा अंत झाला.
हलाखीची परिस्थिती; जवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मृत अविनाश हा स्थानिक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकत होता. तो रवींद्र राजू जवरे यांचा धाकटा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि आजी-आजोबा असा परिवार आहे. जवरे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, घरातील लहानग्या अविनाशच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर गौरखेडा व परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अवैध वाळू उपशामुळे नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी संबंधित वाळू माफिया आणि जबाबदार घटकांवर कठोर गुन्हे दाखल करून नदीपात्र त्वरित सुरक्षित करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सावदा पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मेहरबान तडवी व संजय तडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा