संपूर्ण चौकशी ही पारदर्शक व्हावी म्हणून तक्रारदार आकाश तायडे यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी
यावल (प्रतिनिधी):
यावल तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायतीत सन २०२०-२१ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीत झालेल्या विविध विकासकामांच्या चौकशीला वेग आला आहे. या प्रकरणी तक्रारदार आकाश रमेश तायडे यांनी केवळ कागदोपत्री चौकशी न करता, विकासकामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी, पंचनामा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून अहवाल तयार करावा, अशी मागणी चौकशी अधिकाऱ्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हिंगोणा येथील रहिवासी आकाश तायडे यांनी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत झालेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आज, १४ जुलै रोजी चौकशी समितीने ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. सध्या या प्रकरणाची कागदोपत्री चौकशी सुरू आहे.मात्र, केवळ कागदपत्रांच्या आधारे कामांची खरी वस्तूस्थिती स्पष्ट होऊ शकत नाही, अशी भूमिका तक्रारदाराने घेतली आहे. त्यांनी आजच चौकशी अधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
तक्रारीतील प्रत्येक विकासकामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात यावी.
प्रत्येक कामाचा कायदेशीर पंचनामा तयार केला जावा. तपासणीदरम्यान छायाचित्रे (Photos) व आवश्यकतेनुसार व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे. मंजूर निधी, प्रत्यक्ष झालेले काम, कामाचा दर्जा आणि सद्यस्थिती यांची पडताळणी व्हावी. ज्या कामांमध्ये त्रुटी किंवा अनियमितता आढळेल, त्यावर वस्तुनिष्ठ निरीक्षण नोंदवून संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाईची शिफारस करावी.
२० जुलैला होणार प्रत्यक्ष सुनावणी व चौकशी
सदर कामांची प्रत्यक्ष स्थळे दाखवण्यासाठी स्वतः तक्रारदार चौकशी पथकासोबत उपस्थित राहण्यास तयार आहेत. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने पुढील प्रलंबित चौकशीसाठी येत्या २० जुलै २०२६ (सोमवार) रोजी सकाळी १२:३० वाजता हिंगोणा ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष सुनावणी व चौकशी निश्चित केली आहे.
या ५ वर्षांतील विकासकामांच्या चौकशीतून काय सत्य बाहेर येते आणि प्रशासन दोषींवर काय कारवाई करते, याकडे आता संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष लागले आहे .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा