रावेर तालुक्यातील अजंदे गावात अंत्यसंस्काराला स्मशानभूमीच नाही; ग्रामस्थांमधून संताप - महा एल्गार

Breaking

एकूण पृष्ठदृश्ये

२६ ऑगस्ट २०२६

रावेर तालुक्यातील अजंदे गावात अंत्यसंस्काराला स्मशानभूमीच नाही; ग्रामस्थांमधून संताप

जितु इंगळे प्रतिनिधी 

प्रत्येकाच्या आयुष्याची अखेर ठरलेली आहे. हा शेवटचा प्रवास सुखकर व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, मात्र रावेर तालुक्यातील अजंदे गावासह रावेर तालुक्यातील कित्येक गावे आणि वाड्यांवर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नसल्याची धक्कादायक आणि वेदनादायी वस्तुस्थिती समोर आली आहे. यामुळे या भागातील शेवटच्या प्रवासाची चिंता कधी मिटणार, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ करत आहेत.


खाजगी शेतात अंत्यसंस्कार करण्याची वेळ
प्रत्येक गावाला, वाडीला आणि वस्तीला स्मशानभूमीची अत्यंत गरज असते. परंतु, अनेक ठिकाणी जागेची अडचण असल्याने स्मशानभूमीच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नाईलाजास्तव वैयक्तिक शेतामध्ये बहुतांशी वेळा अंत्यसंस्कार करावे लागतात. भावकीमध्ये मतभेद नसतील तर ठीक, परंतु अनेकदा गावपातळीवर ज्यांची गुंठाभरही जमीन नाही, अशा कुटुंबांची अंत्यसंस्काराच्या वेळी मोठी कुचंबणा होते. गेल्या अनेक वर्षांपासून या गावांमध्ये स्मशानभूमी नाही, ही वस्तुस्थिती असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे प्रश्न प्रलंबित
केवळ प्रशासकीय पातळीवर हा प्रश्न सुटणारा नाही, हे स्पष्ट आहे. यासाठी मंत्री, आमदार आणि खासदार यांनी यामध्ये विशेष लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेकदा जागा मिळवताना स्थानिक पातळीवर अडचणी येतात, अशा प्रकरणांमध्ये त्या-त्या परिसराच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास हे प्रश्न त्वरित सुटू शकतात. वास्तविक पाहता स्मशानभूमी आणि तिथपर्यंत जाणारे रस्ते यासाठी शासनाचा निधी सहज उपलब्ध होत असतो. असे असतानाही इतक्या वाड्या-वस्त्यांवर आणि गावांमध्ये स्मशानभूमी नसणे हे अत्यंत क्लेशदायक आहे.

पालकमंत्र्यांकडे योजनेची मागणी
गावांमध्ये स्मशानभूमीची निर्मिती करण्यासाठी 'जिल्हा नियोजन समिती'मधून (DPDC) विशेष योजना तयार करण्याची गरज आहे. त्यातून जागा घेण्यासाठी अनुदान देऊन, या ठिकाणी लवकरात लवकर स्मशानभूमी कशी उभारता येईल, याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खास लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातही स्मशानभूमी नसलेली गावे अधिक आहेत, याकडेही ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे. आमच्या गावात लवकरात लवकर स्मशानभूमी मंजूर व्हावी, अशी आर्त हाक आता अजंदे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here